बाका प्रसंग
कधीकधी अनपेक्षितरित्या एखादा बाका प्रसंग तुमच्यावर येतो आणि तुम्हाला बरंच काही शिकवून जातो
असाच प्रचंड अस्वस्थ करणारा प्रसंग या विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी घडला.अपघात छोटा असो किंवा मोठा तो अपघात असतो म्हणजे कल्पना नसताना घडलेली गोष्ट.
संध्याकाळची साडेपाच ची वेळ कृष्ण मंदिरातून घरी यायला निघालो होतो. जवळचा पडेल म्हणून नुकताच खुला केलेला पौड रोड ते मयूर कॉलनी यांना जोडणाऱ्या रस्त्यावर गाडी वळवली आणि थोडा पुढं आलो तर रस्ता आडवा खणलेला होता. आता मागे परत फिरण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता . नुकताच तयार केलेला रस्ता त्यामुळे वस्ती वरचे लोक रस्त्यावरच बसलेले होते . मनात विचार आला कशाला आलो ? हा विचार डोक्यात येतोय तोच गाडी कशाला तरी आडली आणि गाडी काही पुढे जाईना म्हटलं एखाद्या दगडाला अडकली असेल म्हणून खाली उतरून पाहिलं तर रस्त्याच्या मधोमध लाईटच्या खांबासाठी छोटासा चौथरा तयार केला होता आणि त्याच्यावर चार मोठे मोठे बोल्टस ग्राउट करून लावले होते. पाव फूट उंच होता grouting केलं होत, ते लाईटच्या खांबासाठी आणि सेफ्टी कव्हर न ठेवता फक्त माती लोटली होती त्यामुळेच तर दिसला नाही. या चौथर्याच्या बरोबर एक बाजूला गाडी अडकली आणि काही केल्या पुढे जाण शक्य नव्हतं. सिमेंटचा चौथऱ्यावरचे बोल्ट बरोबर गाडीच्या दाराच्या खाली येऊन अडकले होते, मला कळून चुकलं हे आपण या मधेच ठेवलेल्या अर्धवट उघड्या खांबावर विचित्र अडकलेलो आहोत. इंजिनीअर असलो तरी मी केमिकल इंजिनिअर आहे आणि मला सिव्हिल, मेकॅनिकल,ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मधले एवढं काही कळत नाही, पण एवढं निश्चित होतं की कामगार अत्यंत चुकीच्या पद्धतीने अर्धवट झालेलं काम उघडे ठेवून, निघून गेले होते. गाडी पुढे मागे केली तर ते बोल्ट 100% गाडीच्या कुठल्यातरी पार्ट मध्ये घुसणार आणि प्रचंड काहीतरी नुकसान होणार हे नक्की होत.
आम्ही गाडीतून उतरलो आणि अत्यंत अपरिचित वस्तीमध्ये मी उभा होतो. आधीच ते सर्व लोक हा रस्ता केला आणि त्याच्यावरन वाहने जातात म्हणून प्रचंड नाराज . त्याच रस्त्यावर माझी गाडी रस्त्याच्या मधोमध अशी अडकलेले की काढता येणं शक्य नव्हतं आणि जसं नेहमी होतं तसंच झालं आजूबाजूला वस्तीतले लोक येऊन जमा व्हायला लागले.मग त्यात काही प्यायलेले होते, काही नवखे आले , काही ज्ञानी होते काही स्त्रिया होत्या काही लहान मुलं असे सर्व प्रकारचे लोक तेथे होते आणि गाडी कशी बाहेर काढता येईल याच्यावर चर्चा सुरू झाली एकदम भारी! त्यातच काही लाकडे, पाहरी घेऊन आले आणि आपण गाडी उचलून बाजूला टाकू अशी असा संवाद चालू झाला. तिथे कुठलाही जास्ती वाद-विवाद घालण्यात अर्थच नव्हता . खरतर माझ्या मदतीला तिथे आल्यावर त्यातल्या 6,7 जणांनी मिळून गाडी उचलली सुद्धा पण नंतर आमच्या सगळ्यांच्याच लक्षात आला की गाडीचे वजन हे बर्यापैकी जास्ती आहे आणि आम्हाला काही ते उचलण शक्य नाही. बरंच सामान आत असल्यामुळे विनीता घराकडे चालत गेल्या पण जाताजाता त्यांनी माझे जवळचे मित्र कौस्तुभ उपासनी यांना फोन केला . त्यांचा स्वतःचा इंजिनिअरिंगचा कारखाना आहे. दहा मिनिटातच कौस्तुभचा मला फोन आला . मी त्याला परिस्थिती सांगितली आणि तो त्वरित तिथे येतोय म्हटल्यानंतर मला थोडं हायसं वाटलं .आता मी एकटा तरी नक्कीच नव्हतो . अशावेळी तुम्हाला निश्चित तुमच्या जवळच्या माणसाची खरच गरज वाटते .
तिकडे गाडी अडकलेलली होती (मी कोणावरही टीका करत नाहीये )मी मनापासून बोलतोय की आपला समाजाबद्दलचा दृष्टिकोन कसा पूर्वग्रहित असतो आणि समाज आपल्याला कशा प्रकारे जोडून ठेवतो आणि असं का म्हणतात की आपण समाजाचा भाग आहोत , हे सर्व मला कालच्या प्रसंगावरून कळलं. प्रसंग खूप वेगळा होता माझ्या दृष्टीने तसं म्हणाल तर पहिलाच ! मी अनेक वाड्या-वस्त्यांवर , मोठ्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये सगळ्यांकडे वेगवेगळे संशोधनात्मक रिसर्च प्रकल्प केलेत. मला लोकांशी संवाद साधता येतो . पण इथे संवाद साधायचा प्रश्नच नव्हता . आजूबाजूला असलेली पाच पंचवीस लोक सर्व प्रकारचे सल्ले देत होते आणि तिथून गाडी काढण्याच्या शिवाय दुसरा कसलाच विचार कोणीच करत नव्हते आणि काही केल्या काय करावं ते कुणालाही समजत नव्हतं. मी मग क्रेन सेवा देणाऱ्या लोकांना फोन करून क्रेन मिळते का याची चौकशी करू लागलो. आता जवळ जवळ साडे सहा वाजले होते. सर्व क्रेन देणाऱ्या लोकांकडूनही नकारघंटाच ऐकायला येत होती. अंधार पडतो आहे आणि आपण पूर्णपणे अनोळखी एरियात एकटे अडकलेलो आहोत याची एक 'नितांतसुंदर' जाणीव मला झाली होती.
तेवढ्यात कौस्तुभ पण देवासारखा धावून आला, त्याच्या या सगळ्यांना मदत करायच्या स्वभावामुळे आम्ही काही मित्र त्याला कौस्तुभ गुरु अशी हाक मारतो. तिकडे वस्तीतली काही तरुण मुलं आम्ही गाडी उचलतो क्रेन ला द्यायचे पैसे आम्हाला द्या या निगोसिएशन पर्यंत आली होती. पहिल्यापासून उभे असलेले ड्रायव्हर काका तुम्ही काही करा पण मुलांच्या हातात गाडी देऊ नका अस मला सारखं सांगत होते आणि तो सल्ला मला पटला होता. एक वस्तीतल्या आजी चक्क हातात काठी घेऊन सर्व थोरामोठ्यांना नियंत्रित करत होत्या. शेवटी आम्ही पोलीस क्रेन मिळते का असा विचार केला . आणि कौस्तुभ तिकडे जातो असं म्हणाला जाता जाता हर्षा, 100% गाडी उचलून बाजूला ठेवता येईल फक्त दोन्ही बाजूंनी ऊचलायला लागेल हे सांगून गेला.
आता अंधार पडायला लागला होता. वस्तीतले एक सद्गृहस्थ गाडी अशी घातलीतच का? यावर मला जाब (भाईगिरी?) विचारून गेले. मला बोलले म्हणून वस्तीतले काही लोक त्यांच्याशी भांडायला लागले. मी समजूत काढून ते भांडण मिटवल. आता क्रेन मिळणार नाही हे जवळपास नक्की होतं, प्रसंगातून सुटायला तर हवच होत. मला कौस्तुभच बोलणं आठवलं आणि मी वस्तीतल्या तिथे दिसणार्या तीन चार माणसांना विनंती केली की आपण सगळेजण मदत करा ,आपण ही गाडी उचलून बाजूला करता येते का बघू. फक्त खांब आणि स्क्रूबोल्टवर परत पडायला नको एवढी काळजी मात्र घेऊ. आणि काय करायचं ते ठरलं , वस्तीतले पन्नास एक लोक एकत्र आले आणि काही कळायच्या आत , हाय्या हो! हाय्या हो ! अस म्हणत त्यांनी गाडी उचलली. आणि उचलून माझी 1000 किलोची ती गाडी, त्या खांबाच्या पलीकडे ठेवली. अहो आश्चर्यम्! गेले दीड तास अडकलेली गाडी , चक्क सगळ्यांचे हात लागल्यावर गोवर्धना सारखी उचलून बाजूला आली होती आणि नंतर गाडी चालू झाली हे पाहिल्यावर सर्वजणांनी भरपूर मोठा गलका करून टाळ्या वाजवल्या. हाच तर भारत आहे नाही का?
त्या कृष्णाला गोवर्धनगिरीधारी का म्हणतात ते मला आज कळलं होतं. गाव करील ते राव काय करील , अशा आशयाच्या अनेक म्हणी आठवायला लागल्या होत्या. अत्यंत कठीण प्रसंगातून आम्ही बाहेर पडलो होतो! कौस्तुभला फोन केला आणि तू म्हणाला होतास तशीच गाडी उचलली आणि आता गाडी नीट बाजूला आली आहे हे सांगितले . तो आला आणि आम्ही दोघांनी त्या वस्तीतल्या लोकांना, ती लोक नाही म्हणत असताना सुद्धा चहाचे पैसे दिले. अत्यंत कौतुकास्पद गोष्ट म्हणजे त्यातल्या एकाही माणसाने माझ्याकडे पैसे मागितले नाहीत . गाडी रस्त्यावर आल्यानंतर त्यातला एकही माणूस तिथे थांबला सुद्धा नाही . आजच्या जगात अशी माझ्या मराठी माणसाची ही माणुसकी दुर्मिळच आहे.
काठी घेऊन गर्दी कंट्रोल करणाऱ्या आजी मला म्हणाल्या बघा आमच्या वस्तीतले लोक असे आहेत , तुम्ही चांगले दिसताय, ह्यांची दारु सुटेल आणि सगळ्यांच्या हाताला काम लागेल असे काही करता आल तर बघा, या दारू मुळेच आठच दिवसांपूर्वी मी माझ्या नवऱ्याला गमावलं आहे. मी त्या आणि आजूबाजूच्या स्त्रियांना म्हंटलं , की नक्कीच मी काहीतरी तुमच्या वस्तीतली दारू कमी होण्यासाठी आणि तुमच्यातली जी मुलं आज नोकरीधंद्याशिवाय आहेत, त्यांना काहीतरी व्यवसाय चालू करून देता येतो का हेही पाहायचा मी प्रयत्न करेन. माझ्यामते आपल्यासारख्या अनेक जणांना अशा प्रसंगांना सामोरे जायला लागले असेल , अनेकांना रस्त्यावरच्या अनेकांची मदत झाली असणार. आपण त्यांनी केलेली मदत परत कशी फेडतो हे खूप महत्त्वाच आहे, मी तर माझ्याकडंन एक छोटा प्रयत्न निश्चित करणार आहे. कोणतरी म्हणाला आहे ना की त्या समाज मनातच परमेश्वर दडला आहे. बघू काही जमते का? माझ्या तमाम मैत्रांपैकी जर कोणी या व्यसनमुक्तीसाठी आणि या वस्तीवरच्या लोकांना उपजीविकेचं चांगलं साधन निर्माण करून देण्यासाठी माझ्याबरोबर येऊ इच्छित असेल तर तुमच्या मदतीची निश्चित गरज आहे. हा गोवर्धन पण उचलायचा प्रयत्न करू मला खात्री आहे श्रीकृष्ण निश्चितच त्याची करंगळी लावून हे गोवर्धन दिव्य पार ही पाडेल. शुभं भवतु!
हर्षवर्धन रानडे
16/11/2021
Comments
Post a Comment