माझ्या तरुण मैत्रांनो, तुम्ही जर का स्वतःच्या उद्योगात असाल किंवा स्वतःचा उद्योग सुरू करायचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात तुमच्या पालकांपैकी कोणाचा स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग असेल तर ही पोस्ट मुद्दामून तुमच्यासाठी लिहीत आहे .

©
मुद्दामून मराठीत लिहितो आहे जास्तीत जास्त मराठी समजत असलेल्या मुलामुलींपर्यंत ही पोस्ट पोहोचणे गरजेचे आहे . महाराष्ट्रात राहतो तो मराठी किंबहुना महाराष्ट्रात जो व्यवसाय किंवा नोकरी करायचा प्रयत्न करतो तो मराठी असा माझा विचार आहे त्यामुळे बाहेरचे इथले असे कुठलेही संदर्भ न लावता कृपया ही पोस्ट नीट कोणताही वाद विवाद न करता विचारपूर्वक वाचा. हे विचार अनेकदा माझ्या व्याख्यानातून किंवा मेंटिंरींग सेशन्स मधून उद्योजकांना सांगितले जातात सध्या मी तरुण निवृत्त होणाऱ्या सैनिकांबरोबर तसेच 18 ते 29 या वयोगटातील तरुणाई बरोबर त्यांना उद्योगात आणण्यासाठी भरपूर काम करत आहे. पण सर्व मुलांपर्यंत पोहोचता येत नाही म्हणून मुद्दामून माझ्या 33 वर्षांच्या उद्योग-अनुभवांवर आधारित असे काही सल्ले किंवा हे उद्योगाचे अलिखित नियम तुमच्यापर्यंत पोहोचवावे आणि त्याचा तुम्हाला उपयोग व्हावा हीच मनापासून इच्छा आहे कारण प्रत्येक व्याख्यानाला तुम्ही सगळे असालच असं नाही आणि तेवढा तुमच्याकडे कदाचित वेळही नसेल म्हणून....
भाग १::
मराठी उद्योग आणि उद्योजकांबद्दल अनेकदा अनेक उपरोधिक टिप्पणी केल्या जातात ,बरेचदा त्या टीका करणाऱ्या व्यक्तीच्या स्वतःच्या अनुभवावर अवलंबून असतात, त्यामुळे या टिप्पणी पूर्णपणे चुकीच्या किंवा गैरसमजुती वर आधारित आहेत असं आपण म्हणू शकत नाही. आज मराठी तरुण ( वरच्या माझ्या व्याख्ये प्रमाणे) वर्ग उद्योगात यायचा प्रयत्न आणि विचार करताना दिसत आहेत. पण बरेच वेळा यशाच्या शोधात ते काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेत नाहीत म्हणून हा शब्द प्रपंच करतं आहे.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यापैकी बहुतांश कुटुंबामध्ये व्यवसायाची पार्श्वभूमी नसते बरेचदा व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणांना त्यांनी उद्योग चालू केला की त्यांच्या मिळणाऱ्या पैशावरून अनेक टोमणे मारले जातात, बरेचदा ही टीका ज्या लोकांनी कधीही व्यवसायात पदार्पणही केलं नाही अशा व्यक्तींकडूनच होते , याचा दुर्दैवाने असा परिणाम होतो की माझा नवा उद्योजक किंवा उद्योजिका दुसऱ्यांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधेनासे होतात. कित्येकदा खरी अडचण न सांगता उगीचच जो व्यवसाय करत आहोत त्याबद्दल वाढवून अतिशयोक्ती ठरेल अशी विधाने केली जातात ‌. आणि खरी अडचण कधीही बोलली जात नाही इंग्रजीमध्ये Camouflage हा शब्द आहे. माझ्या तरुण उद्योजकाची या स्वतः यशस्वी आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नांत तशीच तशीच परिस्थिती होते.
यामुळे होते असे की त्यांच्यावर समोरचा व्यक्ती हळूहळू विश्वास ठेवीनासा होतो .
त्यामुळे अडचणी आणखीन वाढतात आणि या तरुण उद्योजकाला स्वतःचे खरे म्हणणे सुद्धा पटवून द्यायला कित्येकदा अकांडतांडव करायला लागते. या उगीचच प्रूर्विंग सिंड्रोम मुळे होतं असं की उद्योजकाची स्वतःची स्वतःबद्दलची भीती नकळत आणखीन वाढते आणि तो प्रयत्न करण्या ऐवजी उगीचच स्वतः कसे चांगले आहोत स्वतः कसे मोठे आहोत हे दुसऱ्याला पटवून द्यायचा प्रयत्न करत राहतो. आणि तेही त्यांना पूर्णपणे स्वतःच्या क्षमतेची जाणीव असताना हे होतं.
मी माझ्या व्यवसायात जेव्हा या तरुणाईला मार्गदर्शन करत असतो तेव्हा उगीचच होणाऱ्या या Camouflage बद्दल बोलताना, प्लीज तुम्ही कुणालाही स्वतःला सिद्ध करायला जाऊ नका! हे वारंवार सांगतो . तेच आज इथे तुम्हाला सगळ्यांना येथे सांगत आहे. खरंतर आपल्याला निश्चित स्वतःबद्दल आपण काय करतोय ,कुठे आहोत हे माहिती आहे , नक्कीच माहिती असतं! त्यामुळे जर आपल्या मनाला आपण बरोबर काम करतो आहोत असं वाटलं , तर काहीही न जास्त बोलता ते काम करा आणि तुम्ही बोलण्यापेक्षा तुमचं कामच तुमच्याबद्दल बोलेल.
भाग २::
याशिवाय एक दुसरी अतिशय चुकीची गोष्ट माझे बरेच तरुण उद्योजक मित्र करताना दिसतात ती म्हणजे टाळणे‌ किंवा बायपास करणे, गेल्या अनेक वर्षात मी हजारो उद्योजकांना भेटलो आहे त्यांना मार्गदर्शन केलं आहे. अनेकदा एक गोष्ट जाणवते ती म्हणजे माझे तरुण उद्योजक मित्र अनेक गोष्टींची माहिती काढताना अनेकांना भेटतात. गरज पूर्ण होईस्तोवर सतत संपर्क ठेवतात, बरेचदा सर्व गोष्टी खऱ्या सांगत नाहीत आणि माहिती मिळाली की परत त्या व्यक्तीला संपर्कही करत नाहीत! काही वेळा तर थँक्यू म्हणणे तर राहू दे, त्यांच्या घेतलेल्या कामाची किंवा सल्ल्याची काही किंमत आहे का ?त्याला काही प्राईज टँग काय आहे का ? याचा विचारही करत नाहीत आणि त्या माणसाला सरळ बायपास करून आपले काम करून मोकळे होतात आणि त्या संपर्कातील सर्व व्यावसायिकता विसरून जातात. हे अनेकदा होताना मी पाहिल आहे . यामुळे अनेक तोटे होतात कारण ज्या माणसाला तुम्ही एकदा टाळता तो माणूस ते आयुष्यभर लक्षात ठेवतो म्हणजेच तुम्हाला ब्लॅक लिस्ट करतो आणि कधीही तुमच्याबद्दल चांगलं बोलत नाही . त्यामुळे एक सांगेन की समजा त्या व्यक्ती बरोबर तुम्हाला व्यवसायिक संबंध ठेवायचे नसतील त्यांची फी तुम्हाला परवडत नसेल *(हो परवडत नसेल हा शब्द बरोबर आहे कारण प्रत्येक जण स्वतःचे मूल्य स्वतः ठरवतो आणि त्याबद्दल बोलायचा अधिकार व्यवसायात दुसऱ्याला नाही असं माझं स्पष्ट म्हणण आहे) तर त्याला भेटून किंवा मेसेज पाठवून, मेल करून हे सांगणं आपलं व्यावसायिक कर्तव्य आहे, ते आपण न चुकता पाळायला हवं! किंबहुना प्रत्येक फोन कॉल ,प्रत्येक व्हाट्सअप मेसेज किंवा मेल याला, जर तो व्यवसायासंदर्भात असेल तर निश्चितच उत्तर देणं गरजेचं असतं हे मी वेगळं सांगायला नको.
दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की त्या व्यक्तीची आपल्याला पुढे व्यवसायात भविष्यात कधीही गरज लागली तर आपण त्यांना परत संपर्क करू शकतो त्यामुळे हे संबंध जपणं अतिशय गरजेचं आहे.
कौतुकाची गोष्ट अशी आहे की माझ्या उद्योगशाळा प्रकल्पामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या आणि माझ्या वैयक्तिक mentoring खाली तयार झालेल्या एकाही उद्योजकाने असं बायपास कधीही केलेलं नाही कारण आमचे परस्पर संबंध आणि संवाद साधायचे दिलेले मार्गदर्शन आणि आमच्या काय अपेक्षा आहेत याची एकमेकांना दिलेली व्यवस्थित जाणीव!
म्हणूनच आज आमचे अनेक उद्योजक करोडो रुपयांचा व्यवहार करत असूनही त्यांच्या पहिल्या ग्राहकाला आणि मला विसरलेले नाहीत त्यांची प्रत्येक यशस्वी अचीव्हमेंट आमच्याशी शेअर केली जाते.
बघा मी बोललो ते आवडते का? पटलंय आहे का? जर तुम्हाला हे आवडत असेल तर असाच माझ्या अनुभवांवर आधारित संवाद तुमच्याशी साधायला मला वेळोवेळी आवडेल जसा वेळ मिळेल तसा.
तुमचाच
©
हर्षवर्धन विनित रानडे

Comments