दुग्धशर्करा योग
22 ऑक्टोबर 2021,चा भन्नाट दुग्धशर्करा योग : माझ्या आयुष्यात जुळून आला, खरंतर आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात जुळून आला ! आज आमच्या शाळेला शंभराव वर्ष लागलं म्हणून आम्हाला शाळेनं कौतुकाने बोलावलं होतं , ९९ व्या वर्षाच्या वाढिवसानिमित्त!
तसं बाल शिक्षणच्या प्रसिद्ध भंडारकर रोड शाळेचे आम्ही सगळे विद्यार्थी .आम्ही म्हणजे माझे बाबा, आत्या, भाऊ ,बहिणी आणि आत्ताच्या मित्रांपैकी जवळजवळ ४०-५० टक्के जीवश्चकंठश्च मित्र हे सगळे बाल शिक्षण मध्ये शिकलेले.
पीवायसी च्या समोरची क्रिकेटचा बॉल लागून फुटलेल्या घड्याळाची शाळा म्हणजे आमची शाळा!
तर सांगायचा मुद्दा म्हणजे आज शाळेमध्ये बरोबर दहा वाजता मला बोलावलं होतं आणि माझ्या बाकीच्या वर्ग मित्रांना, आम्ही , म्हणजे मी थोडा पुढाकार घेतला म्हणा, साडेअकरा वाजता बोलवल होत.
सगळीकडे नेतृत्वगुण शिकवताना किंवा उद्योजकता शिकवताना , आपण नेहमी पहिल्या खुर्चीवर जाऊन बसल पाहिजे , हे मी लोकांना शिकवतो. आज मात्र शाळेत गेल्यावर पहिल्या दोन, तीन रांगेतल्या खुर्चीवर बसायला जायला मन तेवढ तयार नव्हतं, पण गेल्या एक-दोन वर्षात शाळेच्या सध्याच्या शिक्षकांच्या मी संपर्कात आहे आणि एका कथाकथन स्पर्धेला अध्यक्ष म्हणून मी गेलो होतो त्यामुळे मला शाळेच्या गायकवाड बाईंनी पुढे येऊन बसा! असा आपुलकीने निरोप दिला . मग काय आमची कॉलर आणखीन ताठ होती.
पुढे बसलेल्यांना मागे काय नक्की चाललंय ते कळत नाही. म्हणून तेही कुतूहल होतच. ओळखीचे चेहरे दिसत होते ,अनेक फेसबुक वरचे वेगवेगळ्या वयाचे मित्र होते. इथे खूप फेमस असलेले चिंचोरे सर माझ्या शेजारी बसले होते. जे मला खूपच सीनियर आहेत , तर दुसरे फेमस असलेले आशुतोष बापट हे माझ्या दुसऱ्या बाजूला बसले होते. दैवाचा सुयोग कसा असतो बघा चिंचोरे सरांचे वडील हे शाळेचे मुख्याध्यापक होते, निदान पन्नास-साठ वर्षांपूर्वी! तर आमच्या आशुतोषच्या आई, बापट बाई, याही बाल शिक्षणाच्या मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत (दुर्दैवाने आज मोठे चिंचोरे सर आणि बापट बाई दोघेही हयात नाहीत) आणि म्हणाल तर मीही (दुसऱ्या शाळांच्या) मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापिका असलेल्या बाबा आईचा मुलगा . मागे आमच्या महाबळेश्वरकर सरांचा मुलगा बसला होता . खरच सगळ वातावरण शिक्षणमय झालं होतं उगीच कुठेतरी" जय शारदे वागेश्वरी ...." या ओळी मनात रुंजी घालत होत्या.
एक आद्य क्रांतिकारकांनी चालू केलेली संस्था, जी मुद्दामून मराठीत शिक्षण देत आहे, तिचे हे परंपरा अनुरूप संस्कार आणि भरीस भर म्हणजे ते वातावरण, आपण त्या शाळेचा विद्यार्थी आहोत या प्रचंड अभिमानाची जाणीव करून देत होते.
अध्यक्षीय भाषण संपल्यानंतर , आम्हाला शाळेच्या वर्गांची सर्व दार तुमच्यासाठी उघडी आहेत आणि तुमचा वर्ग आणि शाळेचे आजी-माजी शिक्षक तुमची वाट पाहत आहेत असं सांगितलं गेल्यानंतर , खरंतर जायची घाई आहे वगैरे वगैरे विचार चक्क बाजूला ठेवून , सगळे जवळपास 45 वर्षापूर्वीच्या काळामध्ये ओढले गेलो .आमचे मित्र मैत्रिणी अवघे पन्नाशी चे फक्त, पण हौस तर केवढी दांडगी!
वर्गात काय जात होते. बेंच वर बसून बेंच काय वाजवत होते.सगळे भरपूर दंगा करत होते. फोटो काय काढत होते. काहींना तर पाण्याच्या हौदाच पाणी पण हातानी परत ओंजळीत घेऊन प्यायच होत.
निव्वळ निर्भेळ सुखाची मिळालेली अनुभूती!
खरंच
मजा आली . आम्ही भन्नाट एन्जॉय केलं.
आज मी भाटवडेकर बाई आणि गोसावी बाई सोडून कोणालाही भेटलो नाही. माझ्या पहिलीत शिकवणाऱ्या भाटवडेकर बाई, मला पाहिल्या पाहिल्या म्हणाल्या, हर्षु , तू कथाकथन आणि गोष्टी सांगणं सोडू नकोस हं! हे ऐकल आणि स्वतः चा परत खरच अभिमान वाटला. दहा हजार श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केल्याचं feeling आलं.
आज मला माझ्या वक्तृत्व आणि व्याख्यानांसाठी ठीकठिकाणी बोलवणी येतात
!. तेही मागेन तेव्हढे पैसे देऊन! आणि भाटवडेकर बाईंना ते पंचेचाळीस वर्षांपूर्वीच कळलं होतं!!!

शेवटी हेच थोर शिक्षक आपल्याला घडवतात हेच खरं!
आज परत पटल की हो मी खरच नशीबवान आहे.
हर्षवर्धन रानडे
Comments
Post a Comment